परीस स्पर्श करणारे माझे शिक्षक आदरणीय खट्टे गुरुजी
माझ्या आयुष्याला परीस स्पर्श करणारे माझे शिक्षक
आदरणीय खट्टे गुरुजी
विध्यार्त्यांनी स्वतःच्या कल्याणासाठी गुरूवर श्रध्दा ठेवली पाहिजे . त्याचप्रमाणे त्यांची स्वतःवरही श्रध्दा हवी . आत्मश्रध्दा असणाऱ्यांना विध्या मिळते . गुरुभक्तीकडून ज्ञानशक्ती वृद्धिंगत होते . भारतीय संस्कृतीमध्ये गुरु-शिष्य संवादाला अनन्य साधारण महत्व आहे .साने गुरुजींच्या मते गुरुभक्ती म्हणजे अत्यंत मधुर असे काव्य आहे.
" पुढा स्नेह पाझरे । मागा चालती अक्षरे ।
शब्दापाठी अवतरे । कृपा आधी । "
पुढे प्रेम पाझरते , मागून अक्षरे चालतात , कृपा आधी प्रकट होते आणि शब्द मागून प्रकट होतात . बौद्धिक विकासासाठी आपल्याला ग्रंथांची मदत होऊ शकते . पण आत्मिक उन्नतीसाठी गुरुभक्तीचीच नितांत आवश्यकता असते . गुरूच्या ठिकाणी असणाऱ्या सदगुणांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मैंदर्गीचे माझे आदरणीय गुरु श्री अप्पाराव खट्टे होत .
एकदा शिल्पकार जसा दगडातून मुर्ती घडवतो , त्याप्रमाणे माझा जीवनाला आकारक्षर देण्याचे कार्य खट्टे गुरुजींनी केले . सन १९६१-६२ मध्ये मी मैंदर्गी येथे इ ५ वी मध्ये शिकत होतो . त्यावेळेस खट्टे गुरुजी माझे वर्ग शिक्षक होते . पुढे मी ६ वीत असताना माझ्या शाळेतील गैरहजेरीचे प्रमाण वाढले होते . मी हॉटेल मध्ये काम करीत होतो . सन १९६३-६४ मध्ये सातवीत देखील माझ्या शाळेतील गैरहजेरीचे जास्त प्रमाण वाढले होते .
सहा महिने मी शाळेला गेलो नव्हतो . त्यावेळेस सातवीला बोर्डाची परीक्षा होती . खट्टे गुरुजींना माझा शाळेतील अनियमितपणा लक्षात आला . ते माझ्या घरी आमच्या शाळेचे हेडमास्तर श्री थळंगे गुरुजी सह आले होते.
त्या दोघांनी माझ्या वडिलांना सातवीचा बोर्डाचा फॉर्म भरण्याची विनंती केली . तो प्रसंग अजूनही माझा डोळ्यासमोर उभे राहतो. त्यावेळेस आमच्या कुटुंबाची फॉर्म फी भरण्याची परिस्थिती नव्हती . हे ओळखून खट्टे गुरुजींनी स्वतः माझी फॉर्म फी भरली . त्यानंतर मी दोन तीन महिने नियमित शाळेत गेलो. मन लावून अभ्यास केला.
सातवीच्या बोर्डाच्या परीक्षेत मी ६४ % मार्क्स मिळविले. तसेच पुढे s.s.c. पर्यंत हॉटेल मध्ये काम करत करत शिकत राहिलो. s.s.c. त ६८ % मार्क्स मिळविले. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर बोर्डिंगमध्ये मला प्रवेश मिळाला. त्याठिकाणी राहण्याची व जेवणाची मोफत सोय झाली. तेथून मी मागे वळून पाहिलेच नाही. खट्टे गुरुजींनी दाखविलेल्या दिशेने मार्गक्रमण करीत राहिलो. अशा प्रकारे माझ्या शिक्षणाची मजल मी M.Sc.M. Ed. D.C.S. पर्यंत गाठली. मी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविध्यालयामध्ये भौतिकशास्त्र विषयाचा सहयोगी प्राध्यापक म्हणून करीत होतो. २०११ मध्ये निवृत्त झालो. नंतर ज्ञानश्री इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी मध्ये शैक्षणिक अधिष्ठाता म्हणून काम केलो .सध्याच्या डिजिटल युगामध्ये ब्लॉग आणि यूट्यूब माध्यमाद्वारे विविध विषयावर मार्गदर्शन करीत आहे.
इयत्ता सातवीतील खट्टे गुरुजींचे मार्गदर्शन म्हणजे माझे आयुष्यातील मैलाचा दगड ठरले. माझ्या आयुष्यातील तो एक turning point होता . त्यांनी जर माझा फॉर्म भरला नसता तर कदाचीत मी गावाकडे हॉटेलमध्ये काम करीत राहिलो असतो. माझ्या आजपर्यंतच्या सर्व यशाचे श्रेय मी खट्टे गुरुजींना देतो. ते अतिशय शिस्तप्रिय व हुशार आहेत. तसेच विद्यार्थीप्रिय आहेत. त्यांना सामाजिक कार्याची अतिशय आवड आहे. अशा गुरूकडून माझा अंतःकरणातील दिव्यशक्तीला जागविण्याचे सत्कार्य घडले. त्यांना दीघायुष्य लाभो हीच प्रार्थना करतो व त्यांच्या ऋणात राहणे पसंत करतो.
Wow, what a journey! Amazing 🙌🙌🙌
ReplyDelete